Ad will apear here
Next
नाइटिंगेल ऑफ इंडिया!


काव्यरचना, विद्वत्ता, वक्तृत्व, समाज सुधारणा, स्वातंत्र्य चळवळ व प्रशासन अशा विविध गुण विशेषांनी मढलेल्या सरोजिनी नायडू यांचा जन्म १८७९ साली १३ फेब्रुवारी रोजी एका सधन बंगाली कुटुंबात हैदराबादमध्ये झाला.

त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय. अघोरनाथ १८७८मध्ये हैदराबादला आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. आई वरदासुंदरीदेवी बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन बहरले आणि त्यांना कविता रचण्याचा छंद जडला.

निजामाची छात्रवृत्ती घेऊन सरोजिनी पुढे इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या(१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. 



द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.

सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी डॉक्टरशी ब्राह्मो समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली.

सरोजिनींनी ‘द गोल्डन थ्रेशोल्ड’नंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. भारतीय महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोन, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार अशा वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्य, तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ (भारतीय कोकिळा) म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला; मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.



१९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा नामदार गोपाळ कृष्ण गोखले, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांशी परिचय झाला. त्यांच्या आचार-विचारांनी त्या भारावल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर देशभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारले.

हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर-इ-हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला निषेध म्हणून परत केले.

रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि प्रचार केला, गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदू – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले.
होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ नेते मंडळीही भारावून गेली.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१).

पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५). काँग्रेसच्या सर्व धोरण विषयक चर्चांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरूंनी त्यांची उत्तर प्रदेश या सर्वांत मोठ्या राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. या पदावर कार्यरत असतानाच दोन मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.

भारतीय कोकिळेचे गुंजन कायमचे शांत झाले.

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CUQECV
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language